अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या-पुर्णेत शिवसेनेचे तहसीलदारा दिले निवेदन
पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच कर्जमुक्तीच्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान तसेच पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सततची नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वाढलेला उत्पादन खर्च, महागडी खते व औषधे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने पीक विकावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हाच एकमेव परिणामकारक उपाय असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये — थकबाकीदार, चालू बाकीदार, अल्पमुदतीचे पीक कर्ज, सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज — यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: १. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये थेट आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी. २. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. ३. पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याशिवायच विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. ४. अतिवृष्टीमुळे घरे व पशुवनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य व पुरेसा मोबदला त्वरित द्यावा.
हे निवेदन तहसिलदारांना देताना विधानसभा प्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, तालुका प्रमुख काशिनाथ कांडबाडे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे, साहेबदादा कदम, राजू अण्णा एकलारे, माणिकराव हजारे, उपतालुका प्रमुख बालाजी वैद्य, रमेश ठाकूर, गोविंद सोलव, ताडकळस शहरप्रमुख अनिल नरवटे, बालाजी पिसाळ, सुदामराव ढोणे, कुडलिक मोरे, गजानन सिराळे, विशाल भेसले, बंबुअप्पा बनसोडे, विकास वैजवाडे,प्रा.गोविंद कदम, सुरेश मगरे, ऋषीकेश मोरे,नक्षल कदम,संजय कदम,गौतम दिफके,गणपत शिंदे,आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे शिवसेनेने शेतकऱ्यांना न्याय मिळावा व सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.












