गणरायाला साश्रूनयनाने निरोप; पूर्णेत हर्षोल्हासात ‘श्री’ विसर्जन
सांस्कृतिक वारसा जोपासत गणेशोत्सवाची शांततेत सांगता; पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त
पूर्णा ता.७ (प्रतिनिधी): Purna Ganesh Festival लाडक्या बाप्पाला निरोप देताना पूर्णा शहरासह तालुक्यात शनिवारी (ता.६) गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात, भक्तीभावात व सांस्कृतिक थाटामाटात पार पडल्या. टाळ-मृदुंग, ढोल-ताशांच्या गजरात, देखाव्यांच्या साक्षीने गणरायाला साश्रूनयनाने निरोप देण्यात आला. पोलिस, महसूल व नगरपालिकेच्या नियोजनामुळे सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे संपन्न झाला.


परभणी पोलिस प्रशासनाने डीजे-डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहा दिवसांचा गणेशोत्सव शांततेत साजरा झाला. शहर व तालुक्यातील गणेश मंडळांनी सांस्कृतिक वारसा जपत विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.

शहरात भव्य मिरवणुका. सकाळपासूनच घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू झाले होते.गणेशभक्तांनी पुर्णा नदी,थुना नदी, गवळी गल्ली, बसस्थानक परिसरात,ब्रम्हनाळा येथे विसर्जनासाठी गर्दी केली होती.सायंकाळी ५ वाजता पूर्णा शहरातून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोळीवाडा, महादेव मंदिर, महाराणा प्रताप चौक, किंग कॉर्नर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गांवरून मिरवणुका निघाल्या. महावीर गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ, स्वस्तिक गणेश मंडळ, त्रिशूळ गणेश मंडळ आदी मंडळांच्या वतीने आकर्षक धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक देखावे सादर झाले. बालगोपाळ, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!”च्या जयघोषात नागरिकांनी बाप्पाला निरोप दिला.

चोख पोलिस बंदोबस्त. उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिका, अग्निशमन, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी आदींच्या सहकार्यामुळे सोहळा सुरळीत पार पडला.नगरपालिकेच्या वतीने विविध गणेश मंडळ अध्यक्ष व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री ११ वाजता सोहळ्याची सांगता झाली.


गावागावांतही पारंपारिक निरोप. चुडावा व ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतही ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने श्री विसर्जन सोहळा साजरा केला. भजन, कीर्तनाच्या गजरात शांततेत मिरवणुका पार पडल्या. पोलिसांनी यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताडकळस येथे आज रविवारी श्री विसर्जन
मागील अनेक वर्षांपासून ताडकळस गावात १२ दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे.ही परंपरा जोपासत ताडकळस येथे रविवारी (ता.७) विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत.यास येथिल हाटकर गल्लीतील गणेश मंडळ वगळता सर्वच मंडळ बाराव्या दिवशी श्री विसर्जन करतात.आज रविवारी ताडकळस येथे सकाळपासून तर काहीं मंडळांनी तर मानाचे गणपतींची दुपारनंतर मिरवणुकीला सुरुवात केली जाणार आहे. येथिल विसर्जन सोहळा धानोरा काळे येथील गोदापात्रात पार पडणार असल्याची माहिती ठाणेदार गजानन मोरे यांनी दिली.











