Special Train;तिरुपती साठी नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन.!
पूर्णा ता.२० जुन (प्रतिनिधी)तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.ही गाडी मराठवाड्यातील जालना ,परभणी, नांदेड जिल्ह्यातून चालवली जाणार आहे आणि यामुळे भाविकांसाठी तिरुपती बालाजीला जाण्याची सोय होणार आहे.
दमरेच्या नांदेड रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार “जालना-तिरुपती-जालना” दरम्यान जुलै महिन्यापासून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.या गाडीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे असणार ?
मिळालेल्या माहितीनुसार जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 7 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी या काळात दर सोमवारी जालना मधून रवाना होणार आहे आणि मंगळवारी तिरुपतीला पोहोचेल., दर सोमवारी सकाळी 7 वाजता ही गाडी जालना रेल्वे स्थानकांवरून सोडली जाणार आहे. आणि मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी तिरुपती येथून सोडली जाणार आहे आणि बुधवारी ही गाडी जालनाला पोहोचेल.
तिरुपती येथून मंगळवारी दुपारी 3.15 वाजता सोडली जाणार आहे आणि बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात पोहोचणार आहे. अर्थातच मराठवाड्या तील तिरुपती बालाजीच्या भक्तांना 3 दिवसांत तिरुपतीचे दर्शन करता येणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
जालना – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला या मार्गावरील परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद,लिंगमपल्ली, गुटूर गुडूर, रेनीगुंटा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. नक्कीचया नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे मराठवाड्यातील या संबंधित रेल्वे स्थानकावरून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या तीन दिवसात मराठवाड्यातील भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल आणि रिटर्न पुन्हा एकदा आपल्या घरी जाता येणार आहे.