आयजी पथकाची गोदापात्रात धडक कारवाई
ईंजिन,तराफ्यासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त;चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पूर्णा.ता.५(प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या विशेष पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही करत सुमारे एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करून एका जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही तालुक्यातील मौजे धनगर टाकळी शिवारातील गोदापात्रात शनिवार ता.५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी मागील काही महिन्यांपासून परिक्षेत्रात अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.अवैध धंद्यांवर शेकडो कारवाई विशेष पथकाच्या साह्याने केली जात आहे. पूर्णा तालूक्यातील धनगर टाकळी शिवारात गोदावरी नदीपात्रात विनापरवाना अवैधरित्या डिझेल इंजिनच्या साह्याने तराफे नदीपात्रात सोडून रेती उत्खनन सुरु होते.सदरील विशेष पथकाने शनिवारी दुपारच्या सुमारास विशेष पथक क्रमांक ४ मधील फौजदार श्रिमती शकुंतला डुकरे,पोहेका गौतम ससाणे,पोहेका रामेश्वर खेत्री यांनी चुडावा स्थानकाचे फौजदार अरुण मुखेडकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना सोबतीला घेऊन छापेमारी करण्यासाठी पाळतीवर होते.दुपारच्या सुमारास त्यांना धनगर टाकळी येथील गोदापात्रात इंजिनच्या साह्याने ताफ्यावरून वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून येताच पथकाने नदीपात्रात जाऊन एक ईंजिन,तराफे असा सुमारे एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला . दरम्यान वाळू उपसा करणारे घटनास्थळावरून पसार झाले.जप्त मुद्देमाल ताब्यात घेत याप्रकरणी पोउनि शकुंतला डुकरे यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात अवैध वाळू उपसा तसेच वाळू चोरी सह गौण खनिज कलम कायद्यानूसार धनगर टाकळी येथील ईसम नामे ज्ञानेश्वर रौंदळे यांचे विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तपास सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनात अरुण मुखेडकर करत आहे.विशेष पोलिस पथकाच्या कार्यवाही नंतर वाळू उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.











