महावितरणच्या निष्काळजीपणामुळे २ एकर ऊस जळून खाक!

Spread the love

पुर्णा तालुक्यातील एकरूखा शिवारातील घटना; विद्युत वाहीन्यात शॉर्टसर्किट झाल्याची महीन्यातील तिसरी दुर्घटना;शेतकऱ्यांत संताप

पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी):
पूर्णा तालुक्यातील एकरूखा शिवारात बुधवारी (ता.२२) दुपारी शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत वाहीन्यात शॉर्टसर्किट झाल्याने शेतकरी योगीराज कोंडीबा तांबे यांच्या ऊस शेतीला आग लागून सुमारे दोन एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांत महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकरी तांबे यांच्या गट क्रमांक २१ मधील शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या खांबावरील जुनी आणि सैल विद्युत वाहिनी एकमेकांवर घासल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात शेतकरी योगीराज तांबे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुजलोड हे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

या महिन्यात विद्युत वाहीन्यात शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी अजदापुर आणि कळगांव शिवारातही अशाच प्रकारे ऊस शेती जळाली होती. वारंवार अशा घटना घडूनही महावितरण विभागाने कोणतीही दुरुस्ती किंवा प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने शेतकऱ्यांचा संयम संपला आहे.शेतकऱ्यांनी महावितरणकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page