शेख झिशान व वेदांत भालेराव ठरले पूर्णातील वेगवान धावपटू
विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे खेळाडूंचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वर्चस्व
पूर्णा ता.११(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूल, पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत शेख झिशान शेख मोहसीन (200 मी. धावणे) व वेदांत भालेराव (100 मी. धावणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावून वेगवान धावपटू ठरले. तसेच सय्यद अरसलान सय्यद रशीद (3000 मी.), अब्दुल अयान अब्दुल खादर (3000 मी. द्वितीय), योगेश बोबडे (5 कि.मी. चालणे, भालाफेक), रुद्र जामगे (थाळीफेक – 14 वर्ष गट), किरण सोळंके (1500 मी.), माही क-हाळे (3000 मी.) व वैशाली धूत (थाळीफेक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.रिले स्पर्धेतही शाळेच्या खेळाडूंनी विजेतेपद मिळवले. 100 मी. आणि 400 मी. रिले संघांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवत संघभावनेचे उत्तम प्रदर्शन केले.या सर्व विजयी खेळाडूंची निवड आता जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.












