घरावरील विज तारा हटवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आली अंगलट

Spread the love

पूर्णा तालुक्यातील पिंपळा(लो)३३ के.व्ही. उपकेंद्रातील प्रकार;शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चुडावा पोलीसांत गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

घरावरून गेलेल्या विद्युत तारां काढण्यासाठी ते ३३ के.व्ही उपकेंद्रात बळजबरीने घुसून, पिंपळा लोखंडे गावांसह परिसरातील दहा गावाची वीज बंद करून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून जीव देण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत, ड्युटीवरील ऑपरेटरला धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी देत पाच MV च्या डी.पी वर तब्बल सहा तास बसत स्टंटबाजी करत प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकरण एका ईसमाच्या चांगलेच अंगलट आले असून,त्याला चुडावा पोलीसांनी  जेरबंद करीत विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा व ऑपरेटरला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ता.१५ मे रोजी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोजे पिंपळा लोखंडे येथे महावितरण कंपनीचे ३३ के.व्ही वीज उपकेंद्र आहे. इथून जवळच असलेल्या लोण, मरसूळ, पांगरा ढोणे,वाई,हिवरा,सह एकुण १० गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो, या उपकेंद्रावर  महावितरणने तीन ऑपरेटरची नियुक्ती केलेली आहे.ता.१४ मे रोजी बुधवारी रात्री १० वाजण्याच्या  सुमारास पिंपळा लोखंडे येथील लक्ष्मण उत्तमराव लोखंडे हा विद्युत उपकेंद्रावर आला.त्याने ड्युटीवर तैनात असलेल्या संदीप लक्ष्मणराव चिमनवाड यांच्याशी त्याच्या घरावरुन गेलेले एल.टी. लाईनचे केबल काढण्यासाठी लाईन बंद करण्याची मागणी केली. यावेळी चिमणवाड यांनी संबंधितास तू उपकार्यकारी अभियंता पूर्णा कार्यालयात येथे जाऊन तेथे रितसर अर्ज करून तुझ्या घरावरून गेलेली लाईट काढून घे असे सांगितले. परंतु तो चिमणवाड यांचे काही एक ऐकण्यास तयार नव्हता. त्याने यावेळी तू लाईट जर बंद केली नाहीस तर मी ते ३३ केवी उपकेंद्रात जाऊन माझा जीव देतो असे म्हणून धमकावत होता.

दरम्यान त्याने महावितरण कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गाडेकर तसेच उपकार्यकारी अभियंता रामगिरवार, ग्रामीण अभियंता वसमत कर यांना फोनवरून मला परमिट देत नसल्याने मी जीव देतो अशी नेमकी उद्या इशारा देत .ड्युटीवरील ऑपरेटर चिमणवाड यांना धक्काबुक्की करत बळजबरीने विद्युत उपकेंद्रात घुसून त्याने दहा गावचा विद्युत पुरवठा खंडित केला तसेच पाच एम.व्ही डीपी वर जाऊन बसला. दरम्यान हा सारा गोंधळ सुमारे ६ तास चालू होता.लाईट बंद झाल्याने परिसरातील शेकडो लोक यावेळी घटनास्थळी जमले होते. घटनेची माहिती ऑपरेटरने चुडावा पोलिसांना दिली.चुडवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंग पोमनाळकर, यांनी तातडीने फौजदार मुखेडकर यांच्या सह काही पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाढवले.घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी. आणि विद्युत उपकेंद्रात जाऊन लक्ष्मण लोखंडे यास ताब्यात घेतले. त्याला जेरबंद करून चुडावा पोलीस ठाण्यात आणले दरम्यान महावितरणचे ऑपरेटर संदीप लक्ष्मणराव चिमनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण लोखंडे याचे विरोधात गुरनं व कलम ११३/२५ कलम१३२, २२१,१२१,१२१ (१),२२६, ३५२३५१(३) भा.न्या.स २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार मुखेडकर करत आहेत.

You cannot copy content of this page