Jayakwadi dam: जायकवाडी धरणाचे पाणी,कोणत्याही क्षणी गोदापात्रात सोडणार..!
पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक; शनिवारी जायकवाडी पाटबंधारे खात्याने दिला ईशारा
परभणी,ता.२६(प्रतिनिधी)
Jayakwadi damजायकवाडी (नाथसागर) जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे.प्रकल्पात शनिवारी सायं पर्यंत ८०.७० टक्के एवढा मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. जलाशयात झपाट्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर(ऊ)पैठण कार्यालयाने कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्र.पु.संत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या पैठण येथील नाथसागर जायकवाडी धरणाची साठवण क्षमता जरी १०२.६८ टिएमसी असली तरी आज रोजी पर्यंत जलाशयात ८०.७० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची चालू आवक ओळखून या जलाशयाचे जलप्रचलन आराखड्या नुसार जलपातळीचे नियमन करणे गरजेचे आहे,हे ओळखून पाटबंधारे खात्याने जायकवाडीच्या जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात येत्या काळात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या खात्याच्या कार्यकारी अभियंता प्र.पु. संत यांनी सर्व जिल्हा प्रशासनास पत्र पाठवून तात्काळ आपआपल्या स्तरावरुन खबरदारीच्या उपाययोजना अवलंबवाव्यात, असे आवाहन केले. विशेषतः गोदावरी नदीच्या पात्राच्या दोन्ही तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा, नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरे-ढोरे, विद्युत मोटारी, शेतीचे साहित्य इत्यादी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे व स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना सतर्क राहण्याचे इशारे द्यावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.