अवकाळीचा तडाखा; झिरोफाटा-पूर्णा रस्ता काही काळ रस्ता बंद
कात्नेश्वर महसूल मंडळाला पावसाने झोडपले;जागोजागी विद्युत खांब वाकले
पूर्णा/ प्रतिनिधी
कातनेश्वर शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्रीवादळ सदृश्य, वारा आणि पावसात रस्त्यावरील तसेच शेतातील झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे, कित्येक ठिकाणी आखाड्यावरील पत्रे उडून गेली, अंदाजे शंभर झाडे तुटून पडली आहेत, अ विजेचे खांब पडले आहेत तर झिरो फाटा-पूर्णा रस्ता दोन ठिकाणी झाडे आडवी पडल्याने काही काळ बंद होता.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत थयथयाट सुरू आहे. चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन राज्यात बहुतांश भागात विजेच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार वा-यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे.हवामान विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.सोमवारी २६ मे रोजी सायं ४ च्या सुमारास तालुक्यातील कात्नेश्वर मंडळातील अनेक गावांमध्ये चक्रीवादळ सदृश्य सोसायटयाच्या वारा व पावसाने हजेरी लावली.यावेळी शेत शिवारासह अनेक ठिकाणी शंभरहून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत.तर या वादळामुळे सर्वात जास्त महावितरण कंपनीचे नुकसान झाले असून,१० ते १५ खांब पडले असल्याचे समजते.झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावर दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती.परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात पडलेल्या झाडाच्या फांद्या छाटून थोडा फार प्रमाणात रस्ता मोकळा करून दिला आहे . नागरिकांनी सा.बां विभागास कळवले असुन रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे समजते.येत्या दोन दिवस चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याचे हवामान विभागाने कळविले असुन नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी विजेचा धोका लक्षात घेऊन पाऊस पडताना सुरक्षित जागी आसरा घ्यावा असे आवाहन तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी केले आहे.