विद्युत खांबाला टिप्पर धडकला..
८ तासांपासून बत्तीगुल;महावितरण कंपनीचे दुर्लक्ष
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल आनंदनगर भागातील दक्षीण मुखी हनुमान मंदिरामागील रस्त्यावर असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर टिप्पर आदळल्याने खांब पुरता वाकला असुन महावितरणचे यात ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून,परिसरात सुमारे ८ तासांपासून विज बत्तीगुल झाली आहे.महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.महावितरण कंपनी सदरील टिप्पर मालकांकडून नुकसान भरपाई करून घेणार की त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल करणार का त्यास वा-यावर सोडून महावितरणच्या खर्चातून खांब दुरुस्ती करणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
पूर्णा शहरातील आनंद नगर परिसरात एक दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे.या मंदिराच्या पाठीमागील बाजूस रस्त्यावर महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा करणारे विद्युत खांब आहेत.मंदीरा पाठी मागील बाजूस मोकळी जागा असल्याने येथिल रहिवासी असलेल्या एका स्टोन क्रेशर मालकाने तेथे आपली वाहने उभी केली आहेत.त्यांची वाहने गुरुवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास येथून घेऊन जात असताना त्यांच्या एका पांढ-या लाल रंगाच्या टिप्परने रस्त्याच्या कडेला असलेल्या टिप्परला जोरदार धडक दिली. धडकेत रस्त्याच्या कडेला असलेला खांब वाकला आहे .ज्या वेळी टिप्पर विद्युत खांबाला धडकला त्यावेळी विद्युत वाहिनीच्या तासांत जोरदार स्पार्किंग होऊन आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर पडले.दरम्यान स्पार्किंग झाली तेंव्हा या रस्त्यावर सकाळच्या वेळी परिसरात असलेल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते
मात्र सुदैवाने यावेळी वाहीन्यांच्या खाली कोणी नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. घटनेने तारा एकमेकांना चिकटून पडल्या असून परिसरातील विद्युत पुरवठा मागील ८ तासांपासून खंडीत झाला आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीला येथिल नागरिकांनी खबर दिली मात्र दुपारी ४ वाजेपर्यंत या खांबाच्या दुरुस्ती करीता कोणीही महावितरण कंपनीकडून तसदी घेतली नाही.घटनेत महावितरण कंपनीचे सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.