रस्ता दुरुस्तीसाठी कुढे झालं तिरडी आंदोलन..!
जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्ताठी जनता रस्त्यावर;सा.बां.विभागाचा नाकर्तेपणामुळे जनतेचा आक्रमकपणा
जिंतूर(प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यातील जिंतूर-येलदरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सा.बां विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतप्त नागरिकांनी बुधवार ता. २८ मे रोजी तिरडी यात्रा काढून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.यावेळी सा.बां विभागाचा शासनाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यस्त करण्यात आला.
जिंतूर-येलदरी हा विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. शिवाय जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठीचा हा एकमेव रस्ता आहे, मात्र मागील काही दिवसांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. नागरीक जखमी होत आहेत, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्यात पाणी साचत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच संतप्त नागरिकांनी बुधवारी एकत्र येत तिरडी यात्रा काढून अनोखे आंदोलन केले. या तिरडी यात्रेत नागरीक विविध आशयाचे फलक घेवून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तिरडी यात्रेत तृतीयपंथीयांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. आगामी काळात प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील काळात रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. माधव दाभाडे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे, दामू नवले, गजानन वाघमारे, योगेश हुलगुंडे, अभिषेक चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, ज्ञानेश्वर काकडे, प्रदीप गायकवाड, पवन काकडे, संतोष नवले, अनिल गाडेकर, किशोर मोरे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होते.











