आईच्या जात्यावरील ओव्या लेखनाची प्रेरणा ठरल्या-कवी इंद्रजित भालेराव

Spread the love

पुर्णेतील विद्या प्रसारणी शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादसत्र कार्यक्रम

पुर्णा ता.३०(प्रतिनिधी)शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके,परीक्षा एवढेच नाही तर खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची शिकवण होय.मी शालेय शिक्षणात मागे राहिलो मात्र साहित्य गुणांनी माझ्या जीवनाची जडणघडण झाली. आई जात्यावरच्या ओव्या म्हणायची ,ह्याच ओव्या लेखनाची प्रेरणा ठरल्या, असे मनोगत प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

      पुर्णा येथिल विद्या प्रसारिणी सभा शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादमालिका हा सहशालेय उपक्रम राबविला जात आहे.त्या मध्ये शनिवारी (ता.३०) ऑगस्ट रोजी साहित्यलेखन शब्दांची पाऊलवाट हे संवादसत्र आयोजिले होते.यावेळी मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रसंगी ते बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.विनय वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष भीमरावजी कदम,सचिव श्रीनिवासजी काबरा,उत्तमरावजी कदम, साहेबराव कदम,बाबूराव मोरे,ज्ञानदेव रणमाळ,डॉ.प्रेमचंद सोनी,डॉ.हरिभाऊ पाटील,डी.एफ.गायकवाड, विजय कुमार कदम आदींची उपस्थिती होती.मुख्याध्यापक देवीदास उमाटे,शिवदर्शन हिंगणे,अतिया मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

पुढे बोलताना कधी इंद्रजित म्हणाले की,चौथीला फुकट पास,सातवीला ढकल पास तर दहावीला नापास या स्थितीत बालपणी प्रसंगी गुराख्याचे काम करावे लागले मात्र भगवद्गीता,हजारो ओव्या याच शालेय जीवनात पूर्णपणे पाठ होत्या.लहानपणी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी माझ्या लेखणीला बळ दिले.रानात फिरताना,गुरे राखताना,घरची कामे करताना विषय मिळत गेले आणि कविता लिखाणही.गायी घरी आल्या या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार खऱ्या अर्थाने गुटख्याचा सत्कार होय,याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी त्यांनी माझा बाप,गावाकडे चल माझ्या दोस्ता,जिजाऊ माझी लाडकी लेख व शेवटी ग्रंथाच्या प्रार्थनेने आपल्या संवादसत्राचा समारोप त्यांनी केला.

प्रास्ताविक डॉ.वाघमारे यांनी उपक्रमाची भूमिका मांडली. डॉ.हरिभाऊ पाटील यांनी सन्मानाचे अक्षरपान  या मानपत्राचे वाचन केले.पाराशर स्वामी यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक हिंगणे यांनी आभार मानले.या उपक्रमात काही विद्यार्थ्यांनी  इंद्रजीत भालेराव यांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ रेखाटले होते.ते देत विद्यार्थ्यांनी कवीचे उस्फुर्त स्वागत केले.विद्यार्थिनीच्या संचाचे जातं ही कविता स्वरबद्ध स्वरूपात सादर केली.

You cannot copy content of this page