रेल्वेची कारवाई;बाराशे विनातिकीट प्रवाशांना पकडले,५ लाखांचा दंड वसूल
पूर्णा ता.८(प्रतिनिधी) — रेल्वे विभागाच्या कडक धोरणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नांदेड रेल्वे विभागाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हाती घेतलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल १२०२ विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेतून विभागाने ₹४.९ लाखांचा दंड आणि तिकीट रक्कम वसूल केली. विशेष म्हणजे, १ मे २०२५ नंतरची ही सर्वाधिक आणि विक्रमी एकदिवसीय कारवाई ठरली आहे.
या व्यापक मोहिमेत मनमाड–औरंगाबाद, परभणी–परळी, परभणी–नांदेड, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–अकोला या प्रमुख मार्गांवरील २१ एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. यात सचखंड एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, बेंगळुरू एक्सप्रेस, नांदिग्राम एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस, यशवंतपूर एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, नर–काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, संबलपूर एक्सप्रेस, तसेच पूर्णा–आदिलाबाद, पूर्णा–अकोला आणि नरसापूर–नगरसोल–चेन्नई एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश होता.
ही मोहीम श्रीमती इती पांडे, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे, आणि श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या सूचनांनुसार राबविण्यात आली. मोहिमेचे नेतृत्व श्री एन. सुब्बाराव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांनी केले. त्यांना डॉ. जे. विजय कृष्ण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि श्री रितेश कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी सक्रिय सहकार्य दिले. या कारवाईत एकूण ३२ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) जवान सहभागी झाले होते.
या मोहिमेचा प्रमुख उद्देश विनातिकीट प्रवासावर नियंत्रण, प्रवाशांमध्ये शिस्त व नैतिकता निर्माण करणे, तसेच प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा कडक तपासणी मोहिमा आगामी काळातही सातत्याने राबविण्यात येतील. यामुळे विनातिकीट प्रवाशांना धडा मिळेल आणि प्रामाणिक प्रवाशांना अधिक सुविधा व सुरक्षितता प्राप्त होईल.
प्रवाशांना आवाहन
नांदेड रेल्वे विभागाने सर्व प्रवाशांना कळकळीचे आवाहन केले आहे की,
“नेहमी वैध तिकिटासह प्रवास करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.”
रेल्वे प्रशासनाच्या या मोहीमेमुळे प्रवासी वर्गात एकप्रकारची सजगता आणि शिस्त निर्माण झाली असून, ही विक्रमी कारवाई रेल्वेच्या शिस्तप्रिय धोरणाचे यशस्वी उदाहरण ठरली आहे.












