तरंगल हनुमान मंदिर यात्रेस प्रारंभ
पूर्णा (प्रतिनिधी)
पिढ्यांन पिढ्या मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा पांगरा ढोणे येथिल ग्रामस्थांनी कायम राखली असुन,शिवारातील तरंगल येथिल जागृत देवस्थान परीसरातील हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिर संस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज बुधवार ता.१२ फेब्रुवारी पासून या यात्रेस सुरुवात झाली आहे.
पूर्णा शहरापासून पूर्वेस सहा किलोमीटर अंतरावर तरगंल हनुमानाचे मंदिर आहे.मंदिसात शेंदुराने माखलेली भव्य मूर्ती स्थापित आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची येथे परंपरा आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी सातला मानाचा श्रींचा अभिषेक तुकाराम सदाशिव ढोणे (मुकादम) यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारी (ता. १३) दुपारी तीनला तहसीलदार माधव बोथीकर व चुडावा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर हे दर्शन घेणार आहेत. या यात्रेस परिसरातील खेड्यापाड्यांतील भाविक बैलगाडीसह विविध वाहनांनी येतात. आकाशपाळणे, मिठाई, खेळणे व भांड्यांची दुकाने यात्रेत थाटण्यात आले आहेत. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चुडावा पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.