नतिशा माथूर यांची कोल्हावाडी ग्रामपंचायतीला भेट
वसुंधरा ५.० अंतर्गत ५० लाखांचे पारितोषिक; विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
परभणी/प्रतिनिधी :
मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीने वसुंधरा ५.० अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता मोहिमा, हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या दिशेने राबविण्यात आलेल्या प्रभावी उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीला हा सन्मान जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी कोल्हावाडी ग्रामपंचायतीस भेट दिली.भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील नोंदी व कागदपत्रांची तपासणी केली. तसेच स्वच्छता उपक्रम, हरित प्रकल्प आणि विविध योजनांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.
याच वेळी त्यांनी मानवत येथील पीएमश्री केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेला भेट देत शैक्षणिक दर्जा, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.या प्रसंगी एस. आर. कांबळे, गटविकास अधिकारी मंगेश नरवाडे, गटशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षण अधिकारी के. टी. कानडे, विस्तार अधिकारी (पंचायत) पीयुष केंद्रेकर, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व्ही. आर. वाघमारे, विस्तार अधिकारी (आरोग्य) एम. एम. लोमटे, कोल्हावाडी ग्रामपंचायत अधिकारी डॉ. सय्यद तौफिक, समुदाय आरोग्य अधिकारी कोल्हा तसेच कोल्हावाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.










