परळी बसस्थानक खड्डयात..!प्रवाशांचा जीव मुठीत;प्रशासनाकडे दुर्लक्ष

Spread the love

परळी ता.१६ (प्रतिनिधी):Parli Vaijanth Busstand Newsदेशातील १२ ज्योर्तिलींगापैकी एक राज्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) बसस्थानक सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. बसस्थानक परिसरातील मोठमोठे खड्डे, पावसाचे साचलेले पाणी आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासन व विभागीय अधिकारी वारंवार होत असलेल्या तक्रारी असूनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.


स्थानकाच्या मुख्य रस्त्यासह अंगणभर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या बसना अक्षरशः खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत आहे. प्रवाशांनाही बस पकडण्यासाठी चिखल आणि खड्ड्यांतून पाय ठेवत जाणे भाग पडते.

मुसळधार पावसानंतर या खड्ड्यांत पाणी साचून डबकी तयार होतात. या पाण्यातून चालणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून अनेकदा लहान मुले, महिला व वृद्धांना अडचणींना सामोरे जावे लागते. अंधार पडल्यावर तर अपघाताचा धोका अधिक वाढतो.


“परळी तालुक्याचे हे प्रमुख बसस्थानक असून रोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात. पण हीच त्यांची अवस्था असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडावे लागेल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रवाशांनी दिली.


स्थानिक नागरिक व प्रवासी संघटनांनी प्रशासनास तातडीने खड्डे बुजवून बसस्थानक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाचे पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची सुविधा उभारावी, अशीही मागणी होत आहे.


परळी बसस्थानकासारख्या महत्वाच्या ठिकाणाची अशी अवस्था पाहून नागरिकांचा प्रश्न आहे की, “जिल्हा व राज्य प्रशासन सुरक्षिततेला कधी प्राधान्य देणार?”


You cannot copy content of this page