सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या राकेश किशोरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Spread the love

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अपमान – पूर्णा शहरातून तीव्र संतापाची लाट; राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवले

पूर्णा प्रतिनिधी –
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक कृतीनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून पूर्णा शहरातही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तथाकथित सनातन प्रवृत्तीचा राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान न्यायमूर्ती गवई यांच्या दिशेने पायातील वाहन फेकण्याचा प्रयत्न करून न्यायसंस्थेचा अपमान केला. या घटनेने संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना चाळवून सोडल्या आहेत.

या संदर्भात पूर्णा शहरातील विविध समाजघटक, नागरिक, कार्यकर्ते आणि वकिलांच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षकांमार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात राकेश किशोर यांच्यावर राष्ट्रद्रोह व अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची, तसेच त्यांची वकिलीची सनद रद्द करून जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीविरोधातील कृती नसून भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट प्रहार आहे. अनुसूचित समाजघटकातील न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायासनावर विराजमान झाल्याचे काही सनातन प्रवृत्तीच्या लोकांना सहन होत नाही, ही मानसिकता या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते.

या घटनेचा निषेध करताना उपस्थितांनी असे मत व्यक्त केले की, न्यायसंस्थेचा अपमान म्हणजे देशातील लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर हल्ला असून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. राकेश किशोर यांच्यासारखे उच्चशिक्षित असूनही असंवेदनशील वर्तन करणारे लोक समाजात विषारी वातावरण निर्माण करत आहेत.

सदर निवेदनावर ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, उत्तम खंदारे, रौफ कुरेशी, अशोक कांबळे, देवराव खंदारे, प्रवीण कनकुटे, लक्ष्मण शिंदे, चक्रवर्ती वाघमारे, साहेबराव सोनवणे, अँड. धम्मदीप जोंधळे, गौतम काळे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, रमेश बरकुंटे, विनोद कुमार, महानंद गायकवाड, कुंदन ठाकूर, सचिन वावळे, माजिद कुरेशी आदींसह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हा अवमान केवळ न्यायसंस्थेवरच नव्हे, तर देशातील समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवरही घाव घालणारा आहे. त्यामुळे राकेश किशोर यांच्यावर राष्ट्रद्रोह व अट्रॉसिटीचे गुन्हे तातडीने दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पूर्णा शहरातून एकमुखाने करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page