धनंजय मुंडेंचे मेहुणे मा .आ.डाॅ.केंद्रेंचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा.!
गंगाखेड मतदारसंघात महायुतीला जबर धक्का; कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आ.डॉ. गुट्टेंवर डागले टिकास्त्र
विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड)
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,धनंजय मुंडे यांचे मेहुणे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन महायुतीला जबर धक्का दिला आहे.मेळाव्यात बोलताना केंद्रे यांनी म्हणाले की, महायुतीच्या लोकांनी चोराला पाठबळ दिलं आहे.मला पक्षात ठेवा अथवा न ठेवा मी या राक्षसी प्रवृत्तीच्या महायुती पुरस्कृत रासपच्या उमेदवाराचा प्रचार कदापी करणार नाही, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वर असे जाहीर टिकास्त्र डागत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गंगाखेड विधानसभेचे उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा देखील केली आहे.
गंगाखेड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं राजकारण तापले आहे.मंगळवारी शहरात येथे दुपारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खा. संजय जाधव यांच्या विशेष उपस्थितीसह मिथिलेश केंद्रे,महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, अॅड. मनोज काकानी, अनिल सातपुते, जानकीराम पवार, लिंबाजीराव देवकते, रितेश काळे ,तालुकाध्यक्ष शंकर मोरे, शहराध्यक्ष अन्वरखान पठाण, पूर्णा येथील शहाजी देसाई, प्रमोद मस्के, गोविंद जाधव, शेख खाजा,डॉ. देवीदास चव्हाण, आदींसह गंगाखेड, पुर्णा, पालम तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ .केंद्रे यांनी महायुती पुरस्कृत रासपचे उमेदवार आ. डॉ.रत्नाकर गुट्टें यांचा राक्षस,चोर असा उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल करत थेट टिकास्त्र डागले.महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. पुढे बोलताना डॉ.केंद्रे म्हणाले की, महायुतीच्या लोकांनी चोराला पाठिंबा दिलाय, त्याचा नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.पक्षाचे धोरण चुकीचे होत असल्याने आता आम्ही परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे काम करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा झाल्यावर मी पुढचा काय निर्णय घ्यायचा ते ठरवु असे म्हणत डॉ. केंद्रे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे.यावेळी शिवसेना उपनेते खा. जाधव यांनी देखील रत्नाकर गुट्टे आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.आ.गुट्टेंनी आपल्या मतदार संघात शेतकऱ्याचे पैसे हाणले, त्या पैशांच्या जोरावर राजकारण करुन लोकांना विकत घ्यायची मानसिकता त्यांनी ठेवली आहे, असं संजय जाधव म्हणाले. आज साडे चार हजार कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यांच्या नावानं काढून ते बुडवण्याचं काम रत्नाकर गुट्टे यांनी केल्याचा आरोप देखील संजय जाधव यांनी केला.गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राजकारण तापले असुन महायुतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.आ.डाॅ.केंद्रे यांनी उघडपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे मविआच्या विशाल कदम यांचे पारडे जड झाले मात्र आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणी वाढणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.