पूर्णा तालुक्यात चार गावांचा मतदानावर बहिष्कार..!
रस्त्याचा प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक; प्रशासनाच्या भुमिकेकडे लक्ष
पुर्णा/प्रतिनिधी
तालुक्यातील कोल्हेवाडी पाठोपाठ ,आहेर वाडी,सुरवाडी,वडगांव,भिमनगर या चार गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यांच्या प्रश्ना मार्गी लागावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत थेट विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरच बहीष्कार घालण्याची आक्रमक भुमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली असून, रस्त्यावर उतरून जनता आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी हे गाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने आजही लढा देत आहे.येथिल ग्रामस्थांनी १० दिवसांपूर्वीच जोपर्यंत गावाला जोडणारा पक्क्या रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार घातल्याची भुमिका घेतली आहे.गावाच्या दर्शनी भागात तसा फलकही लावला आहे.प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला परंतु ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघाला नाही.रस्याच्या कामासाठी कोल्हेवाडी पाठोपाठ पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी, वडगाव,सुरवाडी,भीमनगर या चार गावांना जोडणारा (प्रजिमा क्र.१०)रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मागील १० वर्षापासून या रस्त्यासाठी या चारही गावांतील जनतेने वेळोवेळी मोठा संघर्ष केला आहे. या रस्त्यावर खड्डे , पडल्याने रस्त्यावरुन जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्यावर दोन ओढे एक नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने थोडासा पाऊस पडला तरी पुलावरून पाणी जात असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. आधिच रस्ता खराब त्यात पाऊस पडल्यानंतर ती वाट निसरडी होते आणि अपघात घडतात. या रस्त्यावर सतत छोटे-मोठे अपघात होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. अनेकवेळा प्रशासनाकडे विनंती करुनही, अर्ज, निवेदन, तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे या चार गावातील जनता अक्षरश: मेटाकुटीस आली आहे. आता मात्र या चार गावांनी प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी लोकशाहीतील ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. ते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे या चार गावांनी ठरवले आहे. आत्तापर्यंत प्रत्येकवेळी मतदानाच्यावेळी प्रशासन व निष्क्रीय लोकप्रतिनिधी हा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात मात्र रस्ता केला नाही. परिणामी या गावातील महिला, बालके, रुग्ण, विद्यार्थी, व्यापारी, गर्भवती महिला, कर्मचारी वर्ग अशा सर्व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने दाखल न घेतल्यास या चारही गावांनी मतदानावर बहिष्काराचा ठाम निर्धार केला आहे. येणार्या २० नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभेच्या मतदान केंद्रावर एकही नागरिक जाणार नसून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर आहेरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सोपान मोरे, सुरेश पाचकोर, नवनाथ भालेराव, ज्ञानेश्वर मुळे, आदिनाथ भालेराव, गजानन मोरे, कृष्णा मोरे, आनंता मोरे, दिगंबर मोरे, महेश आगलावे, ओमकार मोरे, आदिनाथ मोरे, इंद्रजित मोरे, कृष्णा मोरे, राजेश खंदारे, विकास खंदारे, बालाजी धुतराज, अनिल कदम, हिरामन शिंदे, नागनाथ घाटुळ, गोपिनाथ घाटुळ, योगेश मोरे, संदीप मोरे, गणेश मोरे, रितेश मोरे, डिगांबर मोरे, ओमप्रकाश मोरे, हिरामन मोरे, वैभव खंदारे, भगवान खंदारे, मनोहर खंदारे, सुभाष खंदारे, अजय पेरे, हिरामन पुरी, बंन्सी सलवने, विश्वनाथराव मोरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.