पुर्णेत धाडसी घरफोडी.! दिड लाख रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने लंपास

नव्या मोंढ्यातील घटना; परिसरात खळबळ;चोरट्यांचे पोलीसांना आव्हान;नागरिकांत भीतीचे वातावरण
पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): शहरातील नव्या मोंढा भागात बुधवारी (ता.८) भर दुपारी झालेल्या एका धाडसी घरफोडीने पुर्णा शहरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी व्यापारी अनिल अग्रवाल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दिड लाख रुपये रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने असा हजारो रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
पुर्णा शहरातील नव्या मोंढा परिसरातील अनिल मुन्नालाल अग्रवाल यांचे दुमजली घर आहे. ते आपल्या भावासोबत येथे वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कर्नाटक येथील मुलीकडे भागवत कथा यज्ञ सुरू असल्याने अग्रवाल दाम्पत्य (ता.६) रोजी पत्नी व लहान मुलीसह कर्नाटकात गेले होते. दरम्यान, त्यांचा मुलगा संकेत (वय २३) हा घरी एकटाच होता. तो ताडकळस रोडवरील “अग्रवाल ऑटोमोबाईल्स” या दुकानाचा मालक असून, बुधवारी सकाळी घराला कुलूप लावून दुकानावर गेला होता.
सायं ७ च्या सुमारास संकेत दुकान बंद करून घरी आला. त्याने पाहिले असता घराचा दरवाजा उघडा होता. आत प्रवेश करताच त्याच्या नजरेस घरातील अस्ताव्यस्त पडलेले सामान व कपाटांचे दरवाजे उघडे दिसले. त्वरित त्याने तपास घेतल्यावर व्यापारातील १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड आणि कपाटात ठेवलेले जुने वापरातील सोन्या–चांदीचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ आरडाओरडा करत वरच्या मजल्यावरील आपल्या काकांना व आजोबांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि. सोमेश्वर शिंदे, जमादार श्याम कुरील, बंडू राठोड, पो.का. टाकरस व शेंबेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. घरातील कपाटाचे कुलूप जबरदस्तीने तोडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.या घरफोडीप्रकरणी ठसे तज्ञांना तसेच श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासही सुरुवात केली आहे.
सोन्या–चांदीच्या दागिन्यांचा नेमका अंदाज बाकी
अनिल अग्रवाल हे सध्या कर्नाटकात असून, ते परत आल्यानंतर घरातील दागिन्यांची नेमकी मात्रा आणि अंदाजे किंमत स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे दिड लाख रुपयांची रोकड आणि हजारो रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजते.
परिसरात चर्चा आणि नागरिकांमध्ये भीती
ही घटना दिवसाढवळ्या, गजबजलेल्या नव्या मोंढा भागात घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “शहरात पोलिस गस्त असूनही चोरट्यांनी एवढ्या निर्भयपणे घरफोडी केली, तर शहर सुरक्षित आहे का?” असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली असून, चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, पुर्णा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला असल्याचे समजते.












