बळीराजाकडून ऊस बिलाचा तिसरा हप्त्याचे ९ कोटी२८लाख थेट शेतकऱ्यांच्या खात्यात.!

Spread the love

चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती

पूर्णा ता.९ (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखाना लिमिटेड यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ऊस बिलाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम ₹९ कोटी २८ लाख (₹९२८.०४ लाख) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळाल्याने आर्थिक आधार मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारखान्याने २०२४-२५ गळीत हंगामात ५,७१,७७२.६५९ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ६,३३,५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यामध्ये सरासरी साखर उतारा ११.४८ टक्के आला आहे. त्यानुसार कारखान्याने शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे दर देत तीन हप्त्यांत देय रक्कम वितरित केली आहे.पहिली उचल ₹२५०० प्रति मे.टन, दुसरी उचल ₹३०० प्रति मे.टन आणि आता तिसरी अंतिम उचल ₹१६२.३१ प्रति मे.टन प्रमाणे देण्यात आली असून, यामुळे एकूण एफ.आर.पी. प्रमाणे ₹२९६२.३१ प्रति मे.टन इतका दर शेतकऱ्यांना मिळाला आहे.या रकमेच्या थेट खात्यात झालेल्या जमा हस्तांतरणा मुळे शेतकऱ्यांना दिवाळी खर्च, पेरणी, खतखरेदी तसेच ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीत दैनंदिन गरजांसाठी मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कारखान्याच्या व्यवस्थापनाने वेळेवर हप्ता वितरित करून शेतकऱ्यां प्रती जबाबदारी जपल्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, गळीत हंगाम २०२५-२६ साठी १०,७०० हेक्टर ऊस नोंदणी पूर्ण झाली असून, यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस प्रथम गाळप केला जाईल आणि त्यानंतर बिगर सभासद शेतकऱ्यांचा ऊस स्वीकारला जाणार आहे. शासन निर्णयानुसार ०१ नोव्हेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष गाळप हंगामास सुरुवात होणार आहे.याबाबत कारखान्याचे मा. चेअरमन शिवाजी भगवानराव जाधव व कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी गाळप हंगामाबाबत कोणतीही चिंता करू नये. कारखाना सर्व सभासद आणि ऊस उत्पादकांसोबत ठामपणे उभा आहे, असेही त्यांनी नमूद केले.दुष्काळी परिस्थितीत ऊस बिलाचा तिसरा हप्ता सभासद शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर मिळणार असल्याने बळीराजा कारखान्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणारा आहे .

You cannot copy content of this page