Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

Spread the love

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई;

केज ता.२३(प्रतिनिधी) –
शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या भीषण प्रकरणी केजचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागाने त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. तरीसुद्धा हा ‘रंगेल’ अधिकारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.


निर्जन स्थळी घडला थरार

गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी तिच्या मानलेल्या मावशीसह केक घेण्यासाठी बाहेर पडली होती. त्याचवेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी त्यांना नाष्टा-चहाच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवले.

यानंतर कोल्हेवाडीकडे नेऊन निर्जनस्थळी गाडी थांबवून त्यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने व तिच्या सोबतच्या महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. संतापलेल्या बेडसकर यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र मागून एक वाहन येताना दिसताच बेडसकर गाडी व मोबाईल तेथेच सोडून पळ काढला.


पोलिसांची धावपळ – विभागाचे निलंबन

या घटनेची माहिती मिळताच दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. “हा शिक्षण क्षेत्राच्या अब्रूला काळीमा फासणारा प्रकार आहे” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी बेडसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शिक्षण विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेडसकर यांना तत्काळ निलंबित करण्याची कारवाई केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांनी दिली.


अजूनही फरार – पोलिसांची पथके रवाना

गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटून गेले तरी बेडसकर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना पकडण्यासाठी दोन विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. तरीदेखील आरोपीचा थांगपत्ता लागत नसल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे.


अश्लील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

बेडसकर यांच्या विकृत कारनाम्याची आणखी एक बाजू उघड झाली आहे. त्यांचे एका महिलेसोबतचे अश्लील व लैंगिक संबंधाचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून नागरिकांत प्रचंड रोष पसरला आहे.


वादग्रस्त कारकीर्द

बेडसकर हे नाव नवे वाद घेऊन आलेले नाही. यापूर्वीही लाचलुचपत विभागाच्या छाप्यात ते अडकले होते. सततच्या वादग्रस्त कारवायांमुळेच ते “कुप्रसिद्ध अधिकारी” म्हणून ओळखले जातात.


जनतेची एकच मागणी – या रंगेल अधिकाऱ्याला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी!


You cannot copy content of this page