Beed flood News;पोहनेर गावाला गोदावरीच्या पूराचा वेढा; धनंजय मुंडे होडीतून गावकऱ्यांच्या मदतीला

Spread the love

परळी वैजनाथ ता.२४ (प्रतिनिधी) – बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पूराच्या वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत माजी मंत्री धनंजय मुंडे गावकऱ्यांच्या मदतीसाठी होडीतून पोहचले आणि त्यांच्यासोबत संवाद साधत पुर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी गावकऱ्यांना धीर देताना सांगितले, “सरकार तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. प्रशासनाला मी आवश्यक आदेश दिले आहेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पोहनेर हे फार मोठे गाव असून या परिसरातील अनेक गावांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या जीवितहानीची कोणतीही घटना घडली नसली तरी वीज, अन्न व इतर मूलभूत सुविधा या भागात तुटल्या आहेत., “या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ऊसाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. सांगली व साताऱ्याप्रमाणेच या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. अनेक घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. सर्वांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.”

गावकऱ्यांसोबत संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले की प्रशासन व सरकार तातडीने मदतीसाठी पुढे येईल आणि संकटग्रस्तांना आवश्यक ती मदत लवकरच मिळेल.सध्या परळी तालुक्यातील पोहनेर गावासह आसपासच्या अनेक गावांमध्ये संपर्क तुटल्याने मदतकार्ये सुरू असले तरी परिस्थिती आव्हानात्मक आहे. प्रशासनाने रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसह इतर मूलभूत सुविधा पुनर्संचयित करण्याचे काम जोरदार सुरू केले आहे.

You cannot copy content of this page