बिडच्या केज मध्ये रात्री रक्तरंजित थरार! चायनिज सेंटर चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला..
केज ता.१४(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. केज शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या चायनिज सेंटरवर काम करणाऱ्या तरुणावर काही अज्ञात व्यक्तींनी अक्षरशः हत्येचा प्रयत्नच केला! धारदार शस्त्राने तडाखे देत या तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात लोटल्याची घटना घडली असून, परिसरात क्षणात गोंधळ उडाला.हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव सय्यद इर्शाद असे असून, सध्या त्याच्यावर बीड येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्याला केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुढे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सय्यद इर्शाद आपल्या चायनिज सेंटरवर काम करत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर झडप घातली. क्षणात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केलं आणि चकवा देत घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताने माखलेला इर्शाद जमिनीवर कोसळताच आजूबाजूचे लोक धावत आले आणि पोलिसांना माहिती दिली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे.
सध्या हल्लेखोर कोण आहेत आणि हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या रक्तरंजित घटनेने केज शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “हा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपास सुरू असून, आरोपींचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.लवकरच आरोपींचा पर्दाफाश होईल,”असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.











