Beed;बंजारा समाजाचा एल्गार STआरक्षणासाठी प्रचंड मोर्चे
बीड ता.१५(प्रतिनिधी): मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरचा आधार देत ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर आता बंजारा समाजानेही आरक्षणासाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून, आज सोमवारी (ता.१५) रोजी बीड येथील समाजबांधवांनी प्रचंड मोर्चा काढुनी शासनाचे लक्ष वेधून घेतले.बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काढलेल्या मोर्चात बंजारांची प्रचंड गर्दी झाली. मराठा आरक्षणासाठी संघर्षभूमी ठरलेल्या बीड जिल्ह्यात आता बंजारांचाही आवाज बुलंद होताना दिसला. राजकीय नेत्यांनी सुरुवातीला पाठ फिरवली असली तरी बंजारा समाजाच्या संघटनशक्तीपुढे सर्व नेते अखेर उभे राहिलेले दिसून आले.
बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बंजारा समाजाच्या मागणीला उघड पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे स्वतः मोर्चात सहभागी झाले, तर आमदार सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सहा आमदार बंजारांच्या समर्थनार्थ उभे राहिले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मोर्चात उपस्थित राहून ताकद दाखवली.
अडीच लाखांची लोकसंख्या – निर्णायक मतदानशक्ती
बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या तब्बल अडीच लाखांच्या घरात असून, सुमारे १.९० लाख मतदार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारसंख्या असल्याने कोणताही पक्ष या समाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. गेवराई मतदारसंघातच तब्बल ६३ हजार बंजार मतदार आहेत. माजलगाव, परळी मतदारसंघात ७० हजार तर बीड आणि आष्टीत मिळून ५० हजार बंजार मतदार आहेत. जिल्ह्यातील तब्बल १,२८६ लमाण तांडे बंजारा समाजाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडवतात.
आगामी निवडणुकांवर बंजारांचा प्रभाव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचा हा मोर्चा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. बंजारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील होतील, कारण त्यांच्या मतदानाशिवाय पंचायत समितीपासून जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विजय मिळविणे कठीण आहे.
हैद्राबाद गॅझेटियरचा आधार
मराठा समाजाप्रमाणेच हैद्राबाद गॅझेटियरमध्ये बंजारांच्या नोंदीही सापडल्या आहेत. त्यावरूनच बंजारा समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी करीत आहे. मराठा आंदोलनामुळे राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला होता, आता बंजारांचं आंदोलनही तसंच निर्णायक वळण घेण्याची चिन्हे दिसत आहेत.बीड-जालना जिल्ह्यांतील आजचा एल्गार हा केवळ आरक्षणासाठीचा मोर्चा नसून, आगामी निवडणुकांसाठी बंजारा समाजाच्या मतदानशक्तीचा इशारा असल्याचं स्पष्ट झालं आहे











