जन्मदात्याचा जीव घेणा-या निर्दयी मुलाला तेलंगणा राज्यात पकडले
पूर्णेतील कलमुला गावातील खुन प्रकरण;चुडावा पोलीसांची कारवाई
पूर्णा(प्रतिनिधी)
जन्मदाते वडील प्लाॅट नावाने करुन देत नसल्याने डोक्यात राग घुसवून घेतलेल्या निर्दयी मुलाने १० दिवसांपुर्वी वडीलांच्या डोक्यात लोखंडी सबल घालून खुन करुन पसार झालेल्या मुलाला चुडावा पोलीसांनी तेलंगणा राज्याच्या निजामबाद जिल्ह्यातील श्रीकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे कलमूला येथील रहिवाशी असलेल्या मयत शेख आमीन शेख पीर अहेमद यांना पोटचा मुलगा शेख अकबर याने प्लाॅट नावाने करुन देत नसल्याचे कारणांमुळे ता.२२ जानेवारी रोजी सायं त्यांच्या डोक्यात लोखंडी सबल घालून गंभीर जखमी केले होते.उपचार सुरू असताना त्यांचा नांदेड येथील रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईक असलेल्या शेख अफसर शेख रशीद रा.कलमूला यांच्या फिर्यादीवरून शेख अकबर याच्या विरुद्ध वडीलांचा खुन केल्या प्रकरणी तसेच भांडण सोडवणा-या फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान ही घटना घडल्या पासुन मयत अमिन साब यांचा कुकर्मी पुत्र शेख अकबर हा पसार झाला होता.चुडावा पोलिस त्याच्या शोधात होते.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.नरसिंग पोमनाळकर यांनी पथक तयार करुन शोध सुरू केला होता.मात्र शेख अकबर हा सात ते आठ दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत होता.चुडावा पोलीसांनी तो तेलंगणा राज्याच्या श्रींकोंडा पोलिस ठाण्यात हद्दीतील एका गावात असल्याची खात्री लायक माहिती काढून त्या.३१ रोजी सायं सापळा रचून छापा घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.या कार्यवाहीत सपोनि पोमनाळकर यांच्या सह पोउनि मुखेडकर,पोह राजेश्वर आईटवार,पोशि विलास मिटके हे सहभागी झाले होते.
दरम्यान चुडावा पोलिसांनी शेख अकबर यास ता १ फेब्रुवारी रोजी मा. पूर्णा न्जयायालयासमोर हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्यास मंगळवार ता.४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे