धनुभाऊ मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी..!
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीकरण बदलणार?’रिकामं ठेवू नका’ या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
बीड(परळी)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाला निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी प्रभावी नेतृत्वाचा वापर करण्याचा विचार सुरू असून, बीड जिल्ह्याचा विचार केल्यास माजी मंत्री धनंजय मुंडे हे या भागातील मजबूत चेहरा ठरू शकतात.
बीड जिल्ह्यात सध्या प्रभावी नेतृत्वाचा अभाव जाणवत असल्यामुळे, मुंडेंना संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जागा निवडून आणू शकतो, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर मुंडेंच्या अलीकडील वक्तव्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी प्रांतिक अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे “रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या” अशी स्पष्ट मागणी केली होती.
मुंडेंची ही मागणी केवळ वैयक्तिक नव्हे तर राजकीय संदेश मानला जात आहे. निवडणुका जवळ येत असताना नेतृत्वाला जबाबदारी देण्याची वेळ आली असल्याचे या मागणीमधून सूचित होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.त्यामुळे बीडसह मराठवाड्यातील राजकीय समीकरणात बदल घडवून आणण्यासाठी मुंडेंना महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












