परभणी;दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

Spread the love

पुर्णा तालुक्यातील सुहागन व परभणीतील पोरजवळा येथे दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटना

पूर्णा/ताडकळस (प्रतिनिधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. पुन्हा एकदा दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शिवारात गळफास घेऊन आणि विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. पूर्णा तालुक्यातील सुहागन शिवारात एका वृद्ध शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर परभणी तालुक्यातील पोरजवळा येथे दुसऱ्या शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून पिक फवारणीचे विष प्राशन करून आपले जीवन संपवले. सुहागन (ता. पूर्णा) शिवारात, वाखारी (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील रोहिदास ग्यानोजी भोसले (वय ७०) यांनी सुहागन येथिल शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी शेतीच्या कामानिमित्त घरातून निघाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पर्यंत घरी पोहोचले नाही.दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या मुलगा चांदोजी भोसले यांना नातेवाईकांनी सुहागन येथे एका शेतात आत्महत्या केल्याची माहिती फोनवरून दिली.या घटनेनंतर पूर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह सरकारी दवाखान्यात हलविला. या प्रकरणात मुलगा चांदोजी भोसले यांनी तिघा नातेवाईकांवर आत्महत्येस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला असून पुर्णा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.तर दुसरी धक्कादायक घटना पोरजवळा (ता. परभणी) येथे गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली. येथील गिरमाजी सखाराम लोखंडे (वय ४५) या शेतकऱ्याने नापिकी व आर्थिक अडचणींना कंटाळून शेतातील पिक फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारी सुमारे चार वाजता समोर आली. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चंद्रशेखर मधुकरराव लोखंडे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश लोंढे करीत आहेत.मराठवाड्यातील आत्महत्यांवर सरकार कधी लक्ष देणार? असा संतप्त सवाल आता सर्वत्र विचारला जात आहे.

You cannot copy content of this page