पूर्णा तालुक्यातील आणखी एक शेतकऱ्याचा बळी..!आत्महत्याचे सत्र सुरूच
अतिवृष्टी, नापिकीने कोलमडलेल्या आडगांव (सु) येथिल शेतकऱ्यांने लावला गळफास;आठवड्यात सलग तीघांनी मृत्युला कवटाळे
पुर्णा ता.१२(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे आडगाव (सुगांव) येथील रामराव पिडगे यांनी नैराश्याच्या गर्तेत घेतला शेवटचा श्वास; प्रशासनाच्या तोकड्या घोषणांवर शेतकरी वर्गात संताप
पूर्णा: अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याने जणू ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा आटत चालल्या आहेत. पूर्णा तालुक्यातील आडगाव (सुगांव) येथील ५० वर्षीय शेतकरी रामराव किशनराव पिडगे यांनी शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) रात्री सुमारे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामराव पिडगे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पूर्णा येथील कर्ज होते. तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतातील उत्पादन जवळपास शून्यावर आले, तर कर्जफेड, तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि संसाराचा गाडा चालवण्याची चिंता त्यांच्या मनावर प्रचंड दाटली होती. शेवटी या विवंचनेनेच त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले.घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि सुशांत किंनगे, जमादार वसंत राठोड, विलास मिटके, कच्छवे, मुंडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी त्यांच्या अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात पूर्णा तालुक्यातील मरसुळ येथील अल्पभूधारक शेतकरी चांदू काशिराम शिंदे (वय ६५) आणि तामकळस येथील तरुण शेतकरी डिगंबर तुकाराम तनपुरे (वय ३३) यांनीसुद्धा अशाच कारणांनी आत्महत्या केली होती.
सततची नापिकी, अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. सरकारकडून केवळ तोकड्या घोषणा आणि आश्वासनांवर शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न आता ग्रामिण भागात सर्वत्र विचारला जात आहे.शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांनी प्रशासनाच्या योजनांतील अपुऱ्या अंमलबजावणीवर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “मातीचा पुत्रच जेव्हा मातीला मिळतो, तेव्हा आपल्या विकास योजनांचा अर्थ उरत नाही,” अशी हळहळ आडगाव ते पूर्णा पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.












