पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच!
दिवाळीच्या पूर्वसंध्येला देगावच्या तरुण शेतकऱ्याने लावला गळफास
पुर्णा ता.१७ (प्रतिनिधी): दिवाळीचा आनंद घराघरात पोहोचत असताना पुर्णा तालुक्यातील देगाव गावात एक हृदयद्रावक घटना घडली. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले प्रचंड नुकसान, वाढलेले बँकेचे कर्ज आणि घरातील आर्थिक टंचाई या विवंचनेतून दिपक गंगाप्रसाद वळसे (वय २६, व्यवसाय शेती, रा. देगाव ता. पूर्णा जि. परभणी) या तरुण शेतकऱ्याने घराच्या छताच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना आज शुक्रवार, (ता.१७) ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दीपक हा मेहनती आणि कुटुंबप्रेमी शेतकरी होता. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आणि वाढते कर्ज या ताणातून बाहेर पडता न आल्याने त्याने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच सपोनि सोमनाथ शिंदे, पो.उ.नि. प्रकाश इंगोले, पो.काॅ. अक्कलवाड आणि पो.काॅ. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास फौजदार इंगोले करत आहेत.
पुर्णा तालुक्यात मागील दोन ते तीन माहीन्यात झालेल्या अतीवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.बळीराजा कोलमडुन निघाला आहे.दरम्यान अर्थिक संकटाच्या घे-यात अडकलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.मागुल पंधरा दिवसांत पुर्णा तालुक्यातील चौथी शेतकरी आत्महत्या असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी मरसुळ येथील चांदू काशिराम शिंदे (वय ६५), तामकळस येथील डिगंबर तुकाराम तनपुरे (वय ३३) आणि रामराव किशनराव पिडगे (वय ५०) या शेतकऱ्यांनीही आत्महत्या करून जीवन संपवले होते.
—————————————-
दिवाळीच्या प्रकाशात देखील शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर काळोख दाटला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत असून, शासनाने तातडीने नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि मानसिक आधार यांसाठी उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.












