शेतकरी आत्महत्या.! अतिवृष्टीमुळे पिकं उध्वस्त पुर्णेत शेतकऱ्याची रेल्वेसमोर उडी;थेट मृत्यूकडे प्रवास!

Spread the love

तालुक्यातील मरसुळ गावावर शोककळा;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद…

पूर्णाता.४(प्रतिनिधी)तालुक्यातील मरसूळ गावात आक्रोश व्हावा अशी हृदयद्रावक घटना घडली आहे.सबंध गाव अक्षरशः शोकसागरात बुडाले आहे.आयुष्यभर कष्ट करून संसार हाकणारा, वयाच्या साठीतही हातात कुऱ्हाड घेऊन शेताची मशागत करणारे होतकरु अल्पभूधारक शेतकरी चांदू काशिराम शिंदे (वय ६५) यांनी अतीवृष्टीमुळे पिकं उध्वस्त झाली,पोटाची खळगी कशी भरावी या उद्विग्न भावनेतुन वैफल्याच्या गर्तेत जाऊन थेट धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी (ता.४) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.!

   पुर्णा तालुक्यातील आदर्श गाव मरसुळ येथे मागील दिड महिन्यांत सतत झालेल्या अतिवृष्टीने शिंदेंच्या डोळ्यांसमोर त्यांचे सोयाबीनचे पीक नदीपाण्यात बुडून गेले, आयुष्यभराच्या कष्टाचे मोल एका क्षणात पाण्याने वाहून नेले. हातातोंडाशी आलेले पीक गेले, संसार चालवायचा कसा? कुटुंब पोट भरायचं कसं? अशा हजारो प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेला हा शेतकरी शेवटी मार्ग न सापडल्याने मृत्यूकडे धाव घेतली.शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास”शेताकडे जातो” असे सांगून घराबाहेर पडलेले चांदू शिंदे यांनी गावालगतच्या पूर्णा-अकोला लोहमार्ग रुळावर गेले. आणि क्षणार्धात वसमतकडून पूर्णेकडे येणाऱ्या रेल्वे गाडीसमोर त्यांनी अंग झोकून दिले. डोळ्याच्या पापणी लवते न लवते तोच एका हताश शेतकऱ्याचा जीवनदीप कायमचा मालवला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांतून आसवे धारा सारखी ओघळली. “सरकार कुठं आहे.? शेतकऱ्याचे पिक गेले, शेतकरी गेला… पण कुणाच्या मनात जाग आली का.?” असा जळजळीत सवाल प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाला.

चुडावा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धावून आले, पंचनामा करून घटनेची नोंद घेत,मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवला आहे. पण या औपचारिकतेत गावात मात्र रडण्याचे आवाज, हुंदके आणि शोककळा पसरली होती.वयाच्या साठीनंतरही दिवसाला मिळेल तेवढी मजुरी करून पोट भरणारा हा शेतकरी, नशिबाच्या आघाताने आणि पिकांच्या उद्वस्तीतून असा संपला. मागे राहिलेलं कुटुंब डोळे पुसायला कुणी नाही, आधार द्यायला कुणी नाही अशा अवस्थेत आहे.

“कर्ज, नापिकी, आणि शासनाची उदासीनता – या तिन्ही भुतांनी आमच्या शेतकऱ्याला गिळलं. किती बळी हवेत अजून?”मरसूळ येथील शेतकरी चांदू शिंदे यांचा मृत्यू ही फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर हा संपूर्ण शेतकरी समाजाच्या जिव्हाळ्याचा आक्रोश आहे. पिकं पावसाने वाहून गेली, घर उद्ध्वस्त झालं, कर्जाचं ओझं डोक्यावर आहे, आणि सरकार मात्र दिलासादायक पावले उचलण्यात अपयशी ठरत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या असा आक्रोश मरसूळसह संपूर्ण शेतकरी समाजातून उमटतो आहे.

You cannot copy content of this page