कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुर्णा तालुक्यातील तामकळस येथील घटना;ताडकळस पोलिसांत घटनेची नोंद
पुर्णा ता.११(प्रतिनिधी) : “पिकं उगवतात पण दर नाही, पाऊस पडतो पण वेळ नाही, कर्जाचा डोंगर मात्र दिवसेंदिवस वाढतो…” — अशी हृदयद्रावक वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे. पूर्णा तालुक्यातील तामकळस येथील तरुण शेतकरी डिगंबर तुकाराम तनपुरे (वय ३३) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शनिवारी (दि. ११) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.,
डिगंबर तनपुरे हे मेहनती आणि आशावादी शेतकरी होते. मात्र, गेल्या काही हंगामांपासून सततच्या अनियमित पावसामुळे आणि नापिकीमुळे त्यांचे शेती उत्पन्न घटले. त्यातच एसबीआय बँकेचे घेतलेले कर्ज फेडता न आल्याने ते चिंतेत होते. शनिवारी सकाळी त्यांनी शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, नामदेव सुजलोड, संदीप साळवे, राहुल वडमारे आणि मनोहर पडोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा भाऊ दत्ता तुकाराम तनपुरे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुजलोड हे करीत आहेत.डिगंबर तनपुरे यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेने तामकळस गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून, “पुन्हा एक बळीराजा सावकारकी आणि नशिबाच्या फसवणुकीला बळी पडला” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.












