महाविद्यालयातील ग्रंथालये, वर्गातील ज्ञानच विद्यार्थ्यांना यशस्वी करते – डॉ.धर्मराज वीर
पूर्णा ता.५(प्रतिनिधी) महाविद्यालयातील ग्रंथालये आणि वर्गातील शिक्षकांनी शिकविलेले ज्ञानच विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी करते असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी केले.
पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील अकरावी कला व विज्ञान, बी. ए. प्रथम वर्ष, बी. लिब. सायन्स आणि एम. लिब. सायन्स या वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते तर विचार मंचावर माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम,माजी नगरसेवक सुधाकरराव खराटे, व्यंकटराव कदम,डॉ.सुरेखा भोसले, डॉ.विजय भोपाळे, डॉ.भीमराव मानकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.धर्मराज वीर पुढे बोलताना म्हणाले की, स्पर्धेच्या युगात आणि A I ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) मोबाईलच्या काळात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ग्रंथाचे अध्ययन करून स्वतःला अद्ययावत ठेवले तरच ते स्वतःला सिद्ध करु शकतील व आपले ध्येय गाठू शकतील.स्पर्धेच्या युगात उथळ ज्ञानाला समाज जीवनात कधीच किंमत नसते म्हणून प्रत्येक क्षेत्रातील सखोल व परिपूर्ण ज्ञान संपादन करून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांना नेहमी महाविद्यालयात येऊन तासिका करण्याचे आवाहन करत ग्रंथालयातील वर्तमानपत्रे व विविध विषयांचे ग्रंथ वाचन करून आपले जीवन समृद्ध करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शारदा बंडे यांनी मांडले.तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी तर आभार प्रा. डॉ.प्रभाकर किर्तनकार यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












