पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) “मानवी जीवनाचे खरे कल्याण व्हावे यासाठीच महाराष्ट्रातील संतांनी कार्य केले. प्रत्येकाने अहंकार गाळून मानव सेवेची कास धरली पाहिजे, यातच खरी ईश्वरभक्ती आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुनीलदत्त गवरे यांनी केले.
पुर्णा येथिल स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘संतांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुर्हे होते.पुढे बोलताना प्रा.डॉ.गवरे म्हणाले की, प्रत्येक माणसाने स्वतः मधला अहंकार गाळून मानव सेवा केली पाहिजे.यातच खरी ईश्वर भक्ती असून ईश्वर भक्तीमुळे सर्वांचे भले व्हावे यातच माझे भले आहे. हा विचार खर्या अर्थाने संतांनी दिला असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
बीजभाषणात वाशीम येथील प्रा.डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी संत साहित्याचा इतिहास उलगडून सांगितला व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संतांच्या अध्यात्मिक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.मंचावर सिनेट सदस्या प्रा. डॉ. सुरेखा भोसले, सिनेट सदस्य प्रा.डॉ.विजय भोपाळे, प्रा.डॉ.भिमराव मानकरे आदीं मान्यवर उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या निकिता पानोडे व प्रतीक्षा नडसकर या विद्यार्थिनीं चा सत्कारही संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांनी केले. सूत्र संचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.प्रसंगी महाविद्यालयांचे प्राध्यापक, विभागप्रमुख, विद्यार्थी व तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.