Gangakhed अल्पवयीन मुलीवर अत्याचार;गोर सेनेचा संताप..
आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी – संतप्त नागरिकांचा पोलिस अधीक्षकांना निवेदन
गंगाखेड ता.१३ (प्रतिनिधी) – गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे बुधवारी (दि. 10) सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. केवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी जात असताना आरोपीने तिचे तोंड ओढणीने दाबून घरात ओढून नेले व चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या अमानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पिडीत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी दिपक बालू भोसले याने मुलीच्या ओरडण्यापासून बचाव करण्यासाठी तिच्या तोंडात ओढणी कोंबली. त्यानंतर घरात खेचत नेऊन प्राणघातक हत्यार दाखवून वारंवार धमक्या देत अमानुष कृत्य केले. “आरडाओरड केल्यास खतम करून टाकीन” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील व सोनपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलिस उपनिरीक्षक किरकन पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत गोर सेना संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने जमाव करून आरोपीवर कठोर कारवाईची हाक दिली.
निवेदनावर अंकुश पवार, विजय आडे, नितीन चव्हाण, अनिल राठोड यांच्यासह इतरांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नागरिकांचा संताप लक्षात घेता पोलिसांनी आरोपीवर तत्काळ कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनआक्रोश पेट घेईल, अशी इशाराही यावेळी देण्यात आला.











