जेष्ठा गौरीचे विधीवत पूजन;हर्षोल्हासाचे वातावरण
पुर्णेत सजावट पहाण्याची महीला मंडळींची लगबग;रात्री निरोप
पुर्णा,ता.०२ (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाद्रपद शुध्द सप्तमीस ज्येष्ठा गौरीचे रविवारी (दि.01) घरोघरी मोठ्या हर्षोल्हासात आगमन झाले. तर सोमवारी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचे घरोघरी विधीवत, मोठ्या थाटामाटात पूजन करण्यात आले.
हिंदु धर्मात शहरी व ग्रामीण भागात महालक्ष्मीच्या सणास अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः घरोघरी सामुहीकपणे हा सण साजरा होत आला आहे. त्या निमित्ताने व्यवसाय, नोकरी, शिक्षण वगैरे निमित्त बाहेरगावी असणारे कुटूंबिय आपल्या मूळ गावी, मोठ्या घरी हा सण साजरा करण्या करीता नित्यनेमाने येत आले आहेत. याहीवर्षी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर वगैरे महानगरात स्थितरावलेले हजारो कुटूंबिय मूलां बाळांसह या सणानिमित्त मूळ गावी परतले आहेत.
घरोघरी या महालक्ष्मीच्या सणानिमित्ताने भक्कम अशी पूर्व तयारी गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरु होती. विशेषतः कोथळ्या, पडदे वगैरे सुरक्षित ठेवलेल्या या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. रविवारी गौरीच्या आगमनाच्या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे ठेवलेले ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन गौरीचे मुखवटे, मुलांचे मुखवटे बाहेर काढल्या गेले. गौरीच्या आवाहनाचा रात्री ७ वाजून ५२ मिनीटापर्यंतचा शुभमुहूर्ता साधून कुटूंबियांनी गौरीला आसनस्थ केले. सोमवारी मोठ्या हर्षोल्हासात ज्येष्ठा गौरीचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ गौरीच्या पुजनाचा मुहूर्त साधण्याकरीता कुटूंबियांची मोठी तारांबळ उडाली.आज मंगळवारी गौराईंना सायं निरोप दिला जाणार आहे.घरोघरी आसनस्थ झालेल्या गौराईंची सजावट पहावयास महीला मंडळी सज्ज झाल्या आहेत.
दरम्यान, महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदी करीता नागरीकांची मोठी गर्दी उसळली. विशेषतः पुजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीकरीता नागरीकांची मोठी झुंबड उडाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, मुख्य बाजारपेठेत खरेदीकरीता नागरीकांची मोठी गर्दी उसळली होती.












