एचएआरसी संस्थेचा उपक्रम;अनाथ व निराधार मुले,महीलांना दिवाळी किटचे वाटप

Spread the love

पुर्णा तालुक्यातील फुरकळस येथे पार पडला कार्यक्रम

पूर्णा ता.१६ (प्रतिनिधी): दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने एच.ए.आर.सी. संस्थेच्या वतीने फुलकळस येथे हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.१४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलकळस (ता. पूर्णा) येथे तालुक्यातील एकूण ३६ अनाथ व निराधार मुला-मुलींना दिवाळी किट, तसेच निराधार विधवा मातांना नवीन साडीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, फुलकळस शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख दयानंद स्वामी, ताडकळस केंद्रप्रमुख राम जाधव, देऊळगाव केंद्रप्रमुख प्रमोद अंभोरे, तसेच अनुराज रासकटला, राजेंद्र खापरे, संतोष रत्नपारखे, प्रशांत टाक आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी फुलकळस, कमलापूर, खडाळा, लिमला, माखणी, सुकी, महागाव, निळा, सिद्धेश्वर नगर, धानोरा (का.), देऊळगाव (दु.) या जिल्हा परिषद शाळांमधील एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

दिवाळी किटमध्ये ५ प्रकारचा फराळ (फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाई), मोती साबण, सुगंधी हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पावडर, शॅम्पू तसेच ‘किशोर’ मासिक या वाचन फराळाचा समावेश होता, अशी माहिती डॉ. पवन चांडक यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष रत्नपारखे यांनी केले, सूत्रसंचालन तानाजी कळसाईतकर यांनी तर आभार प्रदर्शन बापूराव चिमटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे, सय्यद मोईन, कानोडे, आबनराव पारवे आणि इतर शिक्षकांनी मोलाचे प्रयत्न केले.हा सामाजिक उपक्रम गावातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला असून, दिवाळीचा आनंद या उपक्रमामुळे अधिक प्रकाशमान झाला.

You cannot copy content of this page