प्रभागनिहाय मतदार याद्यांमधील गोंधळ सुरुच; दुरुस्तीकरिता तहसीलच्या चकरा
पुर्णेत प्रशासनाच्या कारभाराने मतदार त्रस्त; रोजगार बुडवून सुनावणीला जाण्याची वेळ
पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी)
पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. अनेक मतदारांची नावे ते राहत नसलेल्या प्रभागात टाकली गेली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.चुकीची नावे दुरुस्त करण्यासाठी मतदारांना आता तहसील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्या आणि मजुरीवर जगणाऱ्या लोकांना रोजगार बुडवून तीन किलोमीटर दूर असलेल्या तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

काही प्रभागांमध्ये स्थानिक मतदारांच्या ऐवजी इतर प्रभागातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या चुकांबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी योग्य तपास न करता पंचनामे करून नोटिसा पाठवल्या, अशीही माहिती समोर आली आहे.
निवडणूक विभागाच्या या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एका बाजूला प्रशासन चुका करते आणि दुसऱ्या बाजूला त्याच चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदारांना तहसील आणि गंगाखेडपर्यंत फिरवले जाते.
निवडणूक आयोग पारदर्शक निवडणुकीचे दावे करत असताना, पूर्णा नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी नागरिकांना त्रास देत आहेत. याकडे जिल्हा आणि राज्य निवडणूक विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिक आणि तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.












