Malegaon Yatra :नांदेडमधील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला सुरुवात

Spread the love

नांदेड (प्रतिनिधी)


Malegaon Famous Fair:दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला २९ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असुन,पाच दिवस चालणाऱ्या यात्रेतील रविवारी देवसवारी आणि पालखी पूजन सोहळा पार पडला आहे.
पाच दिवसांमध्ये कृषी व पशुप्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, अश्‍व, श्‍वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धा, कुस्त्यांची दंगल, पारंपरिक लोककला महोत्सव, महिला आरोग्य शिबिर, लावणी महोत्सव होणार आहे.माळेगाव यात्रा यंदाही संस्मरणीय ठरविण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. यंदा अधिक मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या यात्रेचे औचित्य, महत्त्व आणि परंपरेला जोपासण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.या यात्रेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी बैठक घेऊन यात्रेच्या निमित्ताने आढावा घेतला.या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जाधव-कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
यंदाची यात्रा प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्यावर भर असेल. कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर, हॉटेल व खाणावळीसाठी डस्टबिन्स ठेवण्यात येतील. मंदिर परिसरात प्लॅस्टिक मुक्तीसाठी जनजागृती आणि महिला बचत गटांकडून कापडी पिशव्यांचे स्टॉल्स उभारले जातील. ॲम्ब्युलन्स आणि रुग्णवाहनासाठी बाइक सेवा सुरू करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. पोलिस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. रस्ते मोकळे ठेवून छोटे व्यापारी एकत्रितपणे ठरावीक जागेवर दुकाने लावू शकतील, असे जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे.जिल्हा परिषदेने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, राज्य उत्पादन शुल्क, बीसएसएनएल, राज्य परिवहन महामंडळ, देवस्थान समिती आणि अन्य विभागांच्या समन्वयाने यात्रा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले.

माळेगाव यात्रेतील पाच दिवसांचे कार्यक्रम

२९ डिसेंबर : देवसवारी आणि पालखी पूजन, महिला व बालक स्पर्धा, भव्य कृषी व पशुप्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार.
३० डिसेंबर : अश्‍व, श्‍वान, कुक्कुट प्रदर्शन, स्पर्धा, महिला आरोग्य शिबिर.
३१ डिसेंबर : कुस्त्यांची दंगल.
१ जानेवारी : पारंपरिक लोककला महोत्सव.
२ जानेवारी : लावणी महोत्सव.

You cannot copy content of this page