रानडुकराच्या कळपास पाहुन पशुधन बिथरले;खदाणीत पडून ४ जनावरे दगावली

Spread the love
पूर्णा तालुक्यातील मिरखेल येथिल घटना;शेतकऱ्याचे साडेतीन लाखांचे नुकसान
पूर्णा ता.१६(प्रतिनिधी)
ताडकळस येथून जवळ असलेल्या मिरखेल गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.सोमवार (ता.१४)जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता शेतातून परतत असताना बैलजोडीसह गायी-म्हशीसह संपूर्ण जनावरे रानडुकरांच्या कळपामुळे घाबरून पाण्याच्या खदानीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे.या घटनेत शेतकरी उमेश परसराम देशमुख यांचे अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिरखेल येथील उमेश देशमुख हे शेतकरी सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर शेती करत असून, सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ताण वाढला आहे. उगवलेली पिके सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना देशमुख सोमवारी आपल्या शेतीवर बैलजोडी, गाबण असलेली म्हैस आणि नुकतीच वासरलेली गाय घेऊन गेले होते.सायं काळी शेतकाम आटपून बैलगाडीतून घराकडे परतताना अचानक रस्त्यावर रानडुकरांचा मोठा कळप समोर आल्या मुळे बैल घाबरले व गाडी घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या खदानीत पडले.या दुर्घटनेत १ लाख १० हजारांची बैलजोडी, गाभण म्हैस आणि नुकतीच वासरलेली गाय जागीच बुडून मृत्युमुखी पडली.या दुर्घटनेने उमेश देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेबाबत वनविभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, देशमुख यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. वन्यप्राण्यांच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांचे जीव व मालमत्ता धोक्यात येत असून,शासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page