नांदेड-पुर्णा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू-१ गंभीर जखमी

Spread the love

पिंपळा (भत्या) येथिल घटना;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद

पुर्णा ता.३ (प्रतिनिधी) – नांदेड-पुर्णा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील मौजे पिंपळा भत्या येथे शुक्रवारी (दि.३ ऑक्टोबर) सकाळी सुमारास १० वाजता घडली.घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संजय शेषराव आसोरे (वय ३४, रा. शक्तीनगर, ईतवारा नांदेड) असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव शिवप्रसाद अशोकराव पाटील (रा. दत्तनगर, भावसार चौक, नांदेड) असे आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहिती नुसार, मृत संजय आसोरे हे आपल्या दुचाकीवर (एम.एच.२६/बी.एच./५३७१) नांदेडहून पूर्णेकडे येत होते. तर त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवर (एम.एच.२६/बी.व्ही./८५४२) शिवप्रसाद पाटील पूर्णेहून नांदेडच्या दिशेने जात असताना पिंपळा भत्या गावाजवळ समोरासमोर धडक झाली.धडक होताच अपघातस्थळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव मोरे यांनी तातडीने चुडावा पोलीसांना माहिती दिली. सपोनि सुशांत किणगे, फौजदार अरुण मुखेडकर, जमादार प्रभाकर कच्छवे, पोहेका मिटके, कैलास ढेंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गंभीर जखमी शिवप्रसाद पाटील यांना व्यंकटराव मोरे व पोहेका मिटके यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.दरम्यान, पोलीसांनी मृत संजय आसोरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण आरोग्य केंद्र कावलगांव येथे पाठवला आहे. या घटनेची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सपोनि किणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You cannot copy content of this page