पिक कापणी प्रयोग- विमा कंपनीच्या‘मापात पाप’!

Spread the love

शेतकरी संतप्त; पालम पोलीस ठाण्यात ठिय्या, विमा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालम (ता. १४ ऑक्टोबर) – परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा लाभापासून वंचित ठेवण्याचा घोर प्रयत्न AIC पिकविमा कंपनीकडून होत असल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासून पालम पोलीस ठाणे व तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “कंपनीच्या मापात पाप, आणि शेतकऱ्यांचा घाम वाया” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.

गेल्या काही महिन्यांतील सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे गोदावरी, लेंडी, मासोळी आदी नद्यांच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोसळलेला असतानाच पिक विम्यातही फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमवारी (१३ ऑक्टोबर) पालम तालुक्यातील पेठशिवणी महसूल मंडळातील खराब धानोरा शिवारात पीक कापणी प्रयोगाच्या वेळी विमा कंपनीचा प्रतिनिधी भोसले यांनी वापरलेल्या काट्याद्वारे मुद्दाम वजन वाढवून दाखवले असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. गावातील दुसऱ्या काट्यावर उत्पादन तोलल्यावर प्रत्यक्ष वजनात २.५ ते ३ किलोपर्यंत फरक आढळला. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आणि कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.

शेतकऱ्यांनी तहसीलदार उषाकिरण श्रीगारे, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी भालेराव यांच्याशी संपर्क साधून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वजन व माप नियंत्रक अधिकारी अनुपलब्ध असल्याने गुन्हा नोंदवला गेला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात मुक्काम ठोकला.

“जोपर्यंत कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या उठवायचा नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.या आंदोलनात पीक विमा चळवळीचे नेते डॉ. सुभाष कदम (जि.प. सदस्य, धारासुर गट) यांच्या नेतृत्वाखाली गोविंद लांडगे, भगवानराव करंजे, मोतीराम शिंदे, बाळू अण्णा बर्डे, विजय कुंटे, कल्याणराव कराळे, दिनाजीराव कराळे, नागेंद्र कराळे, शिवाजी आसाले, पंडितराव कराळे, वैजनाथ राऊत यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांचा आक्रोश आणि विमा कंपनीच्या कारभाराविरोधात संतप्त वातावरणामुळे पालम तालुक्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page