परळीत घरगुती गॅसचा काळाबाजार-नागरिकांचा संताप
सणासुदीच्या काळात प्रशासनाचे दुर्लक्ष, हॉटेलधारकांना गॅस पुरवठा; घरगुती ग्राहक वंचित; प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष
परळी, ता.२९ (प्रतिनिधी) – परळी शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, गेल्या पाच दिवसांपासून बुकिंग करूनही नागरिकांना सिलिंडर मिळत नाही. मात्र, त्याच काळात अनेक हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांना गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांत संतापाची लाट उसळली असून, गॅस एजन्सी व स्थानिक पुरवठा विभागाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
पाच दिवसांपासून सिलिंडर गायब
वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्युटरकडून “गाडी आली नाही”, “माल शिल्लक नाही” अशी सबब देत ग्राहकांना थेट नकार दिला जात आहे. अनेकांनी वेळेवर बुकिंग करूनही पाच दिवसांपासून सिलिंडर न मिळाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एजन्सी बूथसह विविध ठिकाणी “माल शिल्लक नाही” असे फलक लावण्यात आले आहेत.
हाॅटेल धारकांना घरगुती गॅसचा पुरवठा..!
दरम्यान, नागरिकांच्या चर्चेतून धक्कादायक माहिती पुढे येत असून, गॅसच्या गाड्या आल्या तरी त्यातील मोठा हिस्सा हॉटेलधारकांना सर्रास पुरवला जात आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सिलिंडर मिळत नसून, “सणासुदीच्या काळातही नागरिकांना गॅस वंचित ठेवून हॉटेलवाल्यांना पुरवठा केला जातोय” अशी चर्चा जोर धरत आहे.
सरकारच्या नियमांना तिलांजली
सरकारने हॉटेल व्यवसाय व व्यावसायिक आस्थापनांसाठी स्वतंत्र व्यावसायिक सिलिंडरची तरतूद केली असताना, घरगुती सिलिंडर जास्त दराने विक्री करून काळाबाजार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “घरगुती ग्राहकांसाठी असलेला गॅस हॉटेलवाल्यांना विकून एजन्सी धारक काळाबाजार करत आहेत. यावर प्रशासनाने अंकुश आणला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल,” असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.
प्रशासनाचे मौन आश्चर्यकारक
स्थानिक पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी पोहोचत असतानाही, कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिक सांगतात. “गेल्या काही दिवसांत नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी असूनही, पुरवठा विभाग व गॅस एजन्सी यांच्यावर कारवाई होत नाही. प्रशासनाने डोळेझाक केल्यानेच हा काळाबाजार दिवसेंदिवस फोफावत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
👉 नागरिकांचा सवाल –
- गॅस एजन्सी धारकांवर कडक कारवाई होणार का?
- हॉटेलधारकांना घरगुती गॅसचा पुरवठा थांबवला जाणार का?
- पुरवठा विभाग या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का?
सणासुदीच्या काळातच घरगुती गॅसचा तुटवडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, हॉटेलधारकांना पुरवठा सुरू ठेवणे म्हणजे प्रशासनाचे थेट दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या उद्रेकाचा विचार करून, स्थानिक पुरवठा विभाग व प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा संतप्त नागरिकांच्या आंदोलनाची शक्यता नाकारता येणार नाही.












