भगवान बुद्धांचे विचार जगामध्ये शांतता व सुव्यवस्था आणू शकतात – परभणीचे अतिरिक्त पो.अ. सुरज गुंजाळ
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पुर्णा बुद्ध विहारात धम्मदेशना व सत्कार समारंभ
पूर्णा ता.८(प्रतिनिधी):भाद्रपद पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पूर्णा येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश भदंत पयासार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ यांच्या विद्यमाने जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव सु.ल. जाधव, पूर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम, परभणी येथील डॉ. बी.एस. नरवाडे, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. रवी गायकवाड, उद्योजक यशवंत उबारे, डॉ. संघमित्रा नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ म्हणाले, “महामानव तथागत भगवान बुद्धांचे विचार हे जगात शांतता, सुव्यवस्था, मंगलमैत्री आणि समतेचा भाव निर्माण करण्यास समर्थ आहेत. आम्ही पोलीस अधिकारी म्हणून समाजात कायद्याच्या माध्यमातून सुव्यवस्था राखण्याचे काम करतो, परंतु तेच कार्य भगवान बुद्धांनी त्यांच्या शिकवणीद्वारे मानवतेसाठी केले आहे.” त्यांनी ऐतिहासिक उदाहरणे देत बुद्ध धम्माची महती विशद केली. विशेषत: सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर स्वीकारलेले परिवर्तन व त्यांचे राष्ट्राला दिलेले योगदान याचा संदर्भ त्यांनी दिला.
आपल्या मनोगतात बोलताना सेवानिवृत्त सचिव सु.ल. जाधव म्हणाले, “पूर्णा येथील बुद्ध विहार हे एक आदर्श संस्कार केंद्र आहे. येथील ग्रंथालय व अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी पर्वणी आहे.” यावेळी त्यांनी बुद्ध विहार विकासासाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

माजी नगराध्यक्ष विशाल कदम यांनी बुद्ध धम्म विज्ञानाधारित असल्याचे सांगून, “बुद्ध धम्मामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा बुवाबाजीला स्थान नाही,” असे स्पष्ट केले.
प्रमुख धम्मदेशक डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी आपल्या प्रवचनात “बुद्ध विहारातून चरित्र, नीतिमत्ता, सदाचार व कुशल कर्माचा संस्कार सातत्याने दिला जातो,” असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व लुंबिनी स्मरणिका देऊन करण्यात आला. तसेच उद्योजक व माजी आरोग्य सभापती अॅड. हर्षवर्धन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बी.के. आदमाने, माजी उपाध्यक्ष उत्तमभैया खंदारे, डॉ. नरवाडे, दिलीप गायकवाड, इंजि. पी.जी. रणवीर, शामराव जोगदंड, साहेबराव सोनवणे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा व धम्म सेवेत कार्यरत महिला मंडळांनी परिश्रम घेतले.












