Parbhani Breking;दरोडेखोराचा पोलिसांवर चाकू हल्ला;५ दरोडेखोर जेरबंद

Spread the love

चारठाणा हद्दीत सिनेस्टाईल थरार; ५ जखमी पोलिसावर जिल्हा रुग्णालयात उपचार

परभणी, ता. १८ (प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू हल्ल्याची थरारक घटना घडली. हल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हार न मानता आरोपीचा पाठलाग करत अखेर मुख्य आरोपीसह पाच जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला सराईत आरोपी दिपक बिरजू भोसले हा चारठाणा परिसरातील शेतशिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले.

सोमवार (ता. १६) रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, भोसले याने अचानक धारदार चाकूने पोलिस कर्मचारी निलेश भुजबळ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भुजबळ गंभीर जखमी झाले, त्यांच्या पाठीमध्ये चाकू अडकला होता. अखेर थरारक पाठलागानंतर मुख्य आरोपी दिपक भोसलेसह त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी पकडले. जखमी अवस्थेतही पोलिस कर्मचाऱ्यांनी सहका-यांसह दाखवलेल्या या शौर्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, जखमी निलेश भुजबळ यांना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पाठीमध्ये अडकलेला चाकू शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला असून डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीची विचारपूस केली. या प्रकरणी मुख्य आरोपीवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page