परळी-गंगाखेड मार्गावर रेल्वे रुळ बसल्याने वाहतूक कोलमडली..!

पुर्णा (ता.२७)प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. ओढे-नाले, नद्या तुफानी ओसंडून वाहत असून धरणे तुडुंब भरली आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक खंडित झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे आता रेल्वे सेवाही कोलमडली आहे. परभणी-परळी रेल्वेमार्गावर गंगाखेड तालुक्यातील वडगाव निळा दरम्यान रुळ बसल्याची घटना घडली असून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गंगाखेड ते परळी दरम्यान गाडी संख्या ५७६५८ (परळी–परभणी) शनिवारी (ता.२७) रोजी पूर्णतः रद्द केली तर (पुर्णा-परळी) गंगाखेड परळी दरम्यान,(परळी-अकोला) मरसुळ ते परळी दरम्यान,आणी(परळी-अदीलाबाद)परळी ते पुर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ,या मार्गावर तातडीने काम हाती घेतले आहे.येथुन संथ गतीने गाड्या सोडण्यात येत असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत रस्ते वाहतूक ठप्प पडल्यामुळे रेल्वेत प्रवाशांची गर्दी होत आहे.त्यातच आता वडगांव निळा येथिल रुळाखालील भराव खचल्याने काही रेल्वे रद्द केल्या तर काही अंशतः रद्द केल्यामुळे परभणीमार्गे धावणाऱ्या बेंगलोर, कर्नाटक, कुर्डुवाडी, पनवेल, लातूर, उदगीर, काचीगुडा, विजयवाडा अशा महत्त्वाच्या गाड्या उशिराने धावणार असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी (ता.२७) रोजी पुर्णा तालुक्यातील चुडावा स्थानकात पटरीवर पाणी साचले असून, रेल्वे गेट क्र.१३९ वरील भुयारी पुलाची भिंत कोसळली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
⚡ प्रशासन अलर्टवर⚡. रेल्वेच्या वतीने प्रशासनाच्या सर्व अधीकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.












