Parbhani;जांभुळबेट नामशेष होण्याच्या मार्गावर..!
गोदावरी नदीच्या पुराने बेटांचे मोठं नुकसान; संवर्धनाची गरज
पुर्णा ता.४ (प्रतिनिधी)
Jambhulbet was on the verge of extinction due to the flood of Godavari river;परभणी जिल्ह्यातील पुर्णा पालम तालुक्याच्या मधोमध वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये वसलेले नयनरम्य जांभूळबेट हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. नैसर्गिक संपदा, जैवविविधता आणि धार्मिक स्थळामुळे या बेटाला एक वेगळे महत्त्व लाभलेले असतानाच, शासनाच्या दुर्लक्षामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अतिवृष्टी व गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने या बेटाचा मोठा र्हास झाल्याचे दिसून येत आहे.सततच्या पुरामुळे बेटाचा बहुतांश भु-भागात खचल्याने संबंध बेट नामशेष होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.पर्यावरण विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी निसर्ग प्रेमींकडुन व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठणचे (जायकवाडी) नाथसागर धरण शंभर टक्के भरले.संबंधीत प्रशासनाला गोदावरी नदीच्या पात्रात दोन ते तीन वेळा तब्बल ३ लाख क्युसेसपेक्षा अधिक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला.नदीला आलेल्या यामुळे पात्रातील जांभूळबेटावरुन पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात पाहीले. बेटाच्या भुभागावरील मोठ्या पाणी वाहत होते.यामुळे भूभाग खचला असून, बेटाची सुपीक माती वाहून गेली आहे.येथिल अनेक सोई सुविधा नष्ट झाल्या,झाडे वाहुन गेली.बेटाच्या नैसर्गिक रचनेला जबरदस्त फटका बसला आहे. पर्यावरणप्रेमी आणि जाणकारांचे स्पष्ट मत आहे की, शासनाने वेळीच संवर्धनाचे ठोस उपाय केले असते तर आज बेटाची अशी दुर्दशा झाली नसती.

कधीकाळी २७ एकरांवर पसरलेले हे बेट आता केवळ २० एकरावर आटून आले आहे. बेटावरील पुरातन मारुती मंदिर, दुर्मीळ औषधी वनस्पती, फळझाडे आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान यामुळे पर्यटकांसाठी हे ठिकाण स्वर्गीय ठरत होते. परंतु गेल्या काही वर्षांत सततच्या दुर्लक्षामुळे जांभूळबेटाची जैवविविधता धोक्यात आली आहे.स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करताना म्हटले की, ईतरत्र विकास कामांच्या नावाखाली अब्जावधींचा निधी खर्च केला जातो; मात्र या बेटाच्या संवर्धन करण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही.केवळ घोषणा आश्वासन देतात जांभूळ बेटाची पुराच्या पाण्याने मोठी हानी झाली आहे. बेटाच्या संवर्धनासाठी दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी आतातरी लक्ष देणार का..? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गोदामाईंच्या काठावरील हे अद्भुत बेट केवळ परभणी जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याच्या निसर्ग पर्यटनाचा एक अनमोल ठेवा आहे. या ठेव्याचा नाश होत असतानाही शासन व प्रशासन मात्र गप्प बसले आहे.जांभूळबेटाचे संवर्धन तातडीने हाती न घेतल्यास पुढील काही वर्षांत हे पर्यटन स्थळ केवळ इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.