लाचखोर तलाठ्यास एक वर्ष कारावास
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड न्यायालयाचा निकाल;५ हजारांचा दंड
गंगाखेड,ता.१८(प्रतिनिधी) :
लाचखोर तलाठी विकास शारंगधर मार्डीकर (वय ५६) यांना प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगाखेड यांनी एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी युनिटने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मार्डीकर हे सज्जा वडगाव स्टेशन, ता. सोनपेठ येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराच्या भावाच्या नावावर मंजूर झालेल्या मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या १० लाख रुपयांच्या कर्जाच्या फेरफार नोंदीची नक्कल देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीला कलम ७ व १३(१)(ड), १३(२) अन्वये दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.
दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची माहिती किंवा तक्रार असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.










