भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू;
पुर्णा-नांदेड रस्त्यावरील न-हापुर शिवारातील घटना;चार दिवसांच्या चिमुरडीचे छत्र हरवले…!
पुर्णा ता.१० (प्रतिनिधी) Parbhani Purna Accident Newsपुर्णा–नांदेड रस्त्यावर न-हापुर शिवारात बुधवारी (ता.१०) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नांदेडकडे जात असलेल्या छोटा हत्ती (टाटा एस गोल्ड) वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला. घटनेची नोंद चुडावा पोलिसात करण्यात आली आहे.
मुंजाजी सुदामराव क-हाळे (वय ३०, रा. भाटेगाव, ता. पुर्णा, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते पुर्णा सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. दुर्दैवाने, अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला होता.बापाने लेकीला निट डोळे भरून पाहले देखील नसेल, कुटुंबातल्या या आनंदाला काळाने काळीमा फासला.
अपघाताची हकीगत अशी की, मुंजाजी क-हाळे हे आपल्या दुचाकीवरून (एम.एच.२२/बीबी/१९१५) पुर्ण्याहून भाटेगावकडे जात होते. दरम्यान, नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाने (क्र. एम.एच.२६/बीई/५७३८) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत क-हाळे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुषांत किनगे, फौजदार अरुण मुखेडकर, जमादार हिरक जैन यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पुर्णा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मुंजाजी क-हाळे यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व चार दिवसांची चिमुरडी मुलगी असा मोठा परिवार आहे. ते पंचायत समिती अधिकारी विठ्ठल सुदामराव क-हाळे यांचे मोठे बंधू होत. बुधवारी दुपारच्या वेळी भाटेगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या दुर्दैवी घटनेमुळे भाटेगावसह पुर्णा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











