परभणी जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर

Spread the love

राजकीय समीकरणे बदलणार २७ गट महिलांसाठी राखीव

परभणी ता.१३(प्रतिनिधी) परभणी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे राजकीय चित्र बदलणारी आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोडती दरम्यान जिल्हाभरातील राजकीय नेते, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागले होते.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ तसेच २०२५ मधील आरक्षणाच्या पद्धती व चक्रानुसार जिल्हा परिषदेच्या ५४ गटांपैकी तब्बल २७ गट महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचा समावेश आहे. या सोडतीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,निवासी उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार उपस्थित होत्या. ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली.

🔹 अनुसूचित जाती महिलांसाठी : कावलगाव, सावंगी म्हाळसा, उखळी बु., पिंगळी 🔹 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी : चुडावा, ताडकळस, चाटोरी 🔹 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी : आडगाव बाजार 🔹 ओबीसी (महिला) : गौर, केकरजवळा, देवनांद्रा, टाकळी कुंभकर्ण, वरूड, इसाद, रवळगाव 🔹 ओबीसी (सर्वसाधारण) : वाघी धानोरा, मरडसगाव, कुपटा, पेठशिवणी, वझुर, जांब, लिंबा 🔹 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी : वालूर, वस्सा, दैठणा, गुंजेगाव, रामपुरी बु., केरवाडी, नृसिंह पोखर्णी, धारासूर, देवळगाव गात, बोरी, महातपूरी, रावराजूर, टाकळी बोबडे, बाभळगाव, कोद्री, चारठाणा 🔹 सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी : पेडगाव वझुर, राणीसावरगाव, ताडबोरगाव, बनवस, शेळगाव, कासापुरी, झरी, हादगाव बु., एरंडेश्वर, कोल्हा, भोगाव, सिंगणापूर, लोहगाव, कौसडी, चिकलठाणा

या आरक्षण सोडतीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक गट महिलांसाठी राखीव झाल्याने काही जेष्ठ इच्छुकांचे गणित कोलमडले असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राजकीय पातळीवर या सोडतीनंतर तालुकानिहाय चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी, नवे गठबंधन आणि ताज्या रणनीतीचे संकेत मिळू लागले आहेत. पुढील काही दिवसांत जिल्हाभरात तिकिटाच्या चर्चांना वेग येणार असून, राजकीय वातावरणात चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

You cannot copy content of this page